माझी आजी
माझ्या आजीबरोबरच्या माझ्या मनात तशा असंख्य आठवणी आहेत... पण आजी जेवण करताना ते बघणे आणि हजार प्रश्न विचारणे ही आठवण खासच!आमच्याकडे बारा महिने दुपारी देवाला सोवळ्यात स्वयंपाक करून नैवेद्य दाखवतात त्यामुळे दुपारचा स्वयंपाक आजी करायची. दुपारच्या वेळी रोज चुलीवर डाळ आणि त्याच्या मागच्या बाजूला वायलावर भात रटमट असं जेवण शिजत असे. खाली एखादं लाकूड मागे ओढून त्यावर फोडणीसाठी लोखंडी पळी तापत असे. मला ताक करायला आणि लोणी काढायला आवडत असे त्यामुळे मी तिथेच बसून बाजूला ते काम करत बसे.
हे सुरू असताना फोडणीत काय घातलंस, किती घातलंस, आधी मोहरी की हळद की मग आधी मेथी, मग हेच आधी का, तेच का, या भाजीत एवढा मसाला का, त्या भाजीत गूळ का... आणि याव्यतिरिक्त अनेक विषयांवरच्या शेकडो प्रश्नांची सरबत्ती चालू व्हायची. आजी न चिडता शांतपणे काही उत्तरं देत असे किंवा काही प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असे आणि अती झालं की मग मात्र "तुझ्याबरोबर बोलायचं म्हणजे पायलीचा भात खायला हवा..." असं रागवत असे. मग त्यावर माझा प्रश्न 'पायलीभर म्हणजे किती?' आणि मग दोघी हसत असू.
आजही जेवण करताना आजी फोडणी कशी करायची, कुठल्या भाजीत/आमटीत किती मसाला, गूळ, कशात मेथीची फोडणी, कशात काय घालायचं किंवा नाही घालायचं हे थोडं आठवायचा प्रयत्न केला की आठवतं. खरं तर ते नुसतं बोलता बोलता बघितलेलं होतं पण नकळतपणे ते सगळं मनावर पक्कं कोरलं गेलं. माझी आजी साक्षात अन्नपूर्णा होती. तिच्या हाताची चव आजही जीभेवर तरळते.
तिच्या हातचं जेवण जेवून प्रत्येक जण तृप्त होत असे. अगदी गावात कुणाला बरं नसेल, तोंडाला चव नसेल तर आजी गरम गरम आमटी-भात आणि खास लिंबाचं लोणचं पाठवत असे. खाणारा समाधानाने खात असे आणि डबा परत देताना ' तुझ्या हातच्या जेवणानं तोंडाला चव आली, समाधान वाटलं...' हे आवर्जून सांगत असे. तशी चव तिच्या पश्चात कुणाच्याच स्वयंपाकाला आली नाही. जेवताना तिची आठवण आली नाही असा एकही दिवस जात नाही.
आता जेव्हा कोणी माझ्या जेवणाचं कौतुक करताना 'तुझ्या हाताला आजीच्या हातची चव आहे' म्हणतं तेव्हा खूप आनंद होतो.
तिच्याइतकी अचूक नसली तरी तिच्या हातच्या चवीची आठवण होण्याइतपत चव माझ्या हाताला आहे म्हणायला हरकत नाही. तो तिच्याकडून नकळतपणे मला लाभलेला ठेवा आहे.
©️मेधा प्रभुदेसाई